हिम्मत असेल तर सैनिकांवर हल्ला करून दाखवा   

माजी लष्कर अधिकार्‍यांची प्रतिक्रिया 

पुणे : जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये मंगळवारी पर्यटकांवर लष्कराच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करून भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटक ठार झाले असून अनेकजण जखमी झाले आहेत. या भ्याड हल्ल्याचा देशात सर्वच स्तरातून संताप आणि निषेध व्यक्त केला जात आहे. देशातील माजी लष्कर अधिकार्‍यांनी देखील या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत दहशतवाद्यांवर जोरदार प्रहार केला आहे. सर्वसामान्य व निष्पाप पर्यटकांना का मारता, तुम्हच्यात खरचं दम असेल तर भारतीय सैनिकांवर समोरासमोर हल्ला करून दाखवा, अशा संतप्त प्रतिक्रिया माजी लष्कर अधिकार्‍यांनी दिल्या आहेत.  
 
प्रसाद जोशी (माजी लष्कर अधिकारी) : निसर्गाचा आनंद घेण्यासाठी राज्यातून हजारो पर्यटक जम्मू-काश्मीरला जात असतात. त्यावेळी त्यांच्याकडे संरक्षणाची कुठल्याही प्रकारची साधने नसतात. अशा वेळी त्यांच्यावर भ्याड हल्ला होतो, हे अतिशय संतापजनक व चिड आणणार आहे. हा हल्ला दुसरा पुलवामा आहे, असे मी मानतो. हा हल्ला मानुसकीला काळीमा फासणारा आहे.   याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. काश्मीरमध्ये आता कुठे शांतता नांदायला सुरूवात झाली होती. पर्यटनामुळे विकासाला चालना मिळू लागली होती. याच दरम्यान, पर्यटकांवर भ्याड हल्ला होणे म्हणजे काश्मीरच्या विकासात अडथळा आणण्यासारखेच आहे. भारताने असा दहशतवादी हल्ला यापुढे कदापी सहन करून घेऊ नये. केंद्र सरकारने अशा पाकिस्तानी दहशतवाद्यांना कायमचा धडा शिकवावा. अशी मनापासूनची इच्छा आहे,अशी मागणी असणार आहे. 
 
पी. सी. वशिष्ठ (माजी कर्नल) : निष्पाप पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेला भ्याड हल्ला निंदणीय व मानुसकीला काळीमा फासणारा आहे. याचा मी निषेध करतो. अशा दहशतवाद्यांना कुठलाही जात आणि धर्म नसतो. त्यांना निष्पाप नागरिकांना मारून संबंधित ठिकाणी अशांतता व दहशत पसरवण्यासाठी पाकिस्तानाकडून पैसे दिले जातात. अन् दहशतवादी ते करीत असतात. अशा दहशतवाद्यांना कायमचा धडा शिकविणे गरजेचे आहे. यासह पाकिस्तानचे देखील तुकडे तुकडे केले पाहिजे. अशा भ्याड हल्ल्यामुळे काही काळ संबंधित ठिकाणी कुठलाही व्यवसाय अथवा पर्यटक विकास काही प्रमाणात खुंटतो. त्याचा पर्यटकंवर सुध्दा विपरित परिणाम होत असतो. अशा घटनांमुळे पुन्हा पर्यटक त्याठिकाणी शक्यतो जाणे टाळतो. त्यामुळे अशा दहशतवाद्यांचा केंद्र सरकारने कायमचा बिमोड केला पाहिजे.   
 

Related Articles